फालुन दाफा संस्थापक मास्टर ली होंगजी यांचा नवा लेख

कशी अस्तित्वात आली मानवजात

मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना चीनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.

नववर्ष दिवस म्हणजे खरं तर चांगला आणि सुखद संदेश देण्याचा प्रसंग आहे, पण मला मानव जातीवर येऊ पाहणारे संकट स्पष्ट दिसत आहे आणि याच कारणामुळे पवित्र जीवांनी केलेल्या विनंतीनुसार मी अनेक गोष्टी या मानवी जगातील प्रत्येकापर्यंत पोचवत आहे. जे रहस्य आज मी उघड करणार आहे, ते एक उच्च स्तरावरील, अत्यंत संरक्षित असं रहस्य आहे. सद्य परिस्थितीचे खरे चित्र आपल्यासमोर आणण्यासाठी आणि लोकांना या संकटातून वाचवण्याकरिता आणखी एक संधी म्हणून, हे रहस्य आज आपल्यासमोर उघड करत आहे.

मानवजात कशी अस्तित्वात आली हा एक मूलभूत प्रश्न आहे. मानवजातीच्या निर्मितीपासून ते अखेरच्या दिवसापर्यंत, हे विश्व चार टप्प्यांचा समावेश असलेल्या अत्यंत मोठ्या अश्या कालखंडामधून गेले आहे - निर्मिती, स्थिरता, पतन आणि विनाश. विनाश अवस्थेतील अखेरच्या टप्प्यात, मोठ्या वैश्विक स्वरूपातील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाश होतो - ज्यामध्ये आपण अस्तित्वात असलेल्या विश्वाचा समावेश आहे - हे तात्काळ घडते आणि सर्व जीवित प्राणीमात्रांचा नाश होतो.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या भौतिक शरीराचे विघटन होऊन ते नाश पावते, परंतु त्याची चेतना (जी त्याची खरी ओळख आहे, भौतिक शरीराचा नाश झाला तरीही चेतना मृत होत नाही) पुनर्जन्म घेते. म्हणून जसे हे विश्व निर्मिती-स्थिरता-पतन आणि विनाश ह्या अवस्थांमधून जाते, तसेच मानवजात जन्म, वृद्धत्व, आजार आणि मृत्यू या जीवनचक्रातून जाते. विश्वाचे हे नियम उच्चस्तरीय जीवांना देखील लागू होतात परंतु त्यांच्या या जीवन चक्राचा कालावधी जास्त असतो आणि त्यांच्या महानतेनुसार तो अधिक मोठा होतो. त्यांच्यासाठी जन्म आणि मृत्यू वेदनादायी नसतात, ते या प्रक्रियेदरम्यान जागृत असतात आणि त्यांच्यासाठी ही गोष्ट म्हणजे वस्त्र बदलण्यासारखी असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, खऱ्या अर्थाने जीवांचा मृत्यु होत नाही. परंतु हे जग आणि संपूर्ण विश्व, निर्मिती-स्थिरता-पतन-विनाश या अवस्थांमधील विनाशाच्या शेवटच्या टप्प्यात विघटीत होत असतांना, येथील जीवांचा पुनर्जन्म होणार नाही आणि यात कुठल्याही जीवाचे किंवा पदार्थाचे अस्तित्व नसेल. सर्वकाही धुळीकणांमध्ये परिवर्तीत होऊन केवळ शून्यता उरेल. आत्ताच्या घडीला हे मानवी जग निर्मिती-स्थिरता-पतन-विनाश या अवस्थांमधून जात असताना विनाशाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ह्या शेवटच्या टप्प्यात सर्व काही अधिकच विपरीत होताना दिसत आहे, जे निश्चितच होते आणि याचे भवितव्य म्हणजे विनाश अटळ आहे. याच कारणामुळे आज हे जग इतक्या दु:खात आहे. चांगले विचार दुर्मिळ झाले आहेत, लोकांचे विचार विकृत झाले आहेत. व्यभिचार, नशेच्या औषधांचा वापर सर्रास झाला आहे. लोक नास्तिक होऊ लागले आहेत. अर्थात मानवजात या विश्वातील विनाशाच्या शेवटच्या टप्प्यात असतांना हे होणे अपेक्षितच आहे आणि हे आज आपण कोणत्या क्षणास पोहोचलो आहोत हेच दर्शविते.

या विश्वाचा निर्माता अस्तित्वात असलेल्या सर्व आकाशीय प्राणीमात्रांचा, चांगल्या आणि करुणामयी जीवांचा, तसेच या सृष्टीतील सर्व श्रेष्ठ रचनांचा सांभाळ करतो. म्हणूनच पतन काळाच्या सुरवातीलाच, निर्मात्याने या सर्व जीवांना वैश्विक स्वरूपाच्या सर्वात बाहेरील स्तरावर आणले (ज्याला सर्वसाधारणपणे “दिव्य लोकाच्या बाहेर” असे देखील म्हणू शकतो) , म्हणजेच अशी जागा जिथे पवित्र जीव नसतील, अर्थात त्याने ही पृथ्वी निर्माण केली, परंतु पृथ्वीची स्वतंत्रपणे अस्तित्वात राहण्याची क्षमता नव्हती; म्हणूनच अशी एक सुसंगत वैश्विक रचना आवश्यक होती, ज्यामध्ये त्यातील जीव आणि पदार्थ यांसाठी संपूर्ण संचार प्रणाली असेल आणि यासाठीं निर्मात्याने पृथ्वीच्या बाहेर एक मोठे क्षेत्र बनवले ज्याला उच्चस्तरीय जीव “त्रिलोक” असे म्हणतात. मुक्तीची अंतिम वेळ येईपर्यंत, कुठल्याही उच्चस्तरीय जीवांना, मग तो कितीही महान असला तरीही, निर्मात्याच्या परवानगीशिवाय इथे प्रवेश करण्याची अनुमती नव्हती. त्रिलोकाच्या क्षेत्रामध्ये हे तीन लोक सामील होतात. पहिला ‘इच्छा लोक’ (यू) जो या मानवजाती आणि पृथ्वीवरील जीवांसहित बनला आहे, दुसरा ‘आकार लोक’ (से) जो इच्छा लोकाच्या वर आहे आणि तिसरा लोक जो त्याच्या वर आहे तो म्हणजे ‘निराकार लोक’ (वू से). प्रत्येक वरच्या स्तरावरील लोक हा त्याच्यापेक्षा खाली असलेल्या लोकापेक्षा अधिक उच्च आणि तेजस्वी आहे, परंतु यांची तुलना आकाशीय लोक किंवा कित्येक उच्च आकाशीय सृष्टीसोबत होऊ शकत नाही. मनुष्य ज्या आकाशीय लोकाचा उल्लेख करतो, ते खरं तर त्रिलोकातील ‘आकार लोक’ किंवा ‘निराकार लोक’ यामध्येच आहे. या त्रिलोकातील प्रत्येक लोकामध्ये १० स्तर आहेत, जेणेकरून त्रिलोक धरून आपण एकूण ३३ स्तर आहेत असे म्हणू शकतो. मनुष्य ‘इच्छा’ लोकामध्ये राहतो, जो या स्तरांमधील सगळ्यात खालचा स्तर आहे आणि येथील जीवनमान अधिक खडतर आहे. येथील जीवन दु:खदायक आणि छोटे आहे, पण याही पेक्षा भयंकर म्हणजे या मानवी जगात अत्यंत कमी गोष्टी अशा आहेत; ज्या मनुष्य सत्य आहे असे मानतो, त्या वास्तवात वैध आहेत. मनुष्य ज्याला सत्य मानतो, ते उच्च वैश्विक नियमानुसार त्याच्या विपरीत आहे.(याला अपवाद म्हणजे पवित्र जीवांनी मनुष्याला सांगितलेले उच्चस्तरीय सत्य) उदाहरणार्थ, उच्चस्तरीय जीव हे योग्य समजत नाहीत की जो युद्धामध्ये जिंकेल तो यशस्वी शासक होईल, तसेच सैन्यबलाद्वारे दुसऱ्यांचे क्षेत्र काबीज करणे किंवा शक्तीशाली व्यक्तीला नायक बनवणे या गोष्टी योग्य नाहीत कारण यामध्ये हत्या, दुसऱ्याकडून जबरदस्तीने हस्तगत करणे या विपरीत गोष्टी आहेत. हा या विश्वाचा मार्ग नाही आणि उच्चस्तरीय जीव देखील असा मार्ग अवलंबणार नाहीत. तरीदेखील मानव जातीमध्ये या गोष्टी अनिवार्य आणि स्वीकारल्या गेल्या आहेत. हे मानव जातीसाठीचे मार्ग असले तरी विश्वाच्या नियमाच्या विपरीत आहे आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला ‘आकाशीय लोक’ प्राप्तीसाठी विश्वाच्या खऱ्या, उच्च नियमांचे पालन करत स्वतःमध्येच सुधार घडवून आणणे आवश्यक आहे. काही लोक आपण दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले आहोत, या विचाराने संतुष्ट होतात, परंतु ते ही तुलना केवळ या मानवी स्तरावर करत आहेत आणि वास्तवात आपण राहत असलेला स्तर हा विश्वातील कचरापेटी समान आहे. आकाशीय स्वरूपाच्या सर्वात बाहेरील स्तरावर, जिथे त्रिलोक आहेत, इथे सर्वकाही निकृष्ट, अशुद्ध आणि मलीन कण— अणु, परमाणु यापासून बनले आहे, उच्चस्तरीय जीवांच्या दृष्टीने ही जागा म्हणजे विश्वातील एक कचरा फेकण्याची जागा आहे. ते या स्तराला धूळ किंवा मातीसमान मानतात आणि याकडे सगळ्यात खालचा स्तर म्हणून बघतात. काही धर्मांमध्ये दिव्य जीवांनी माणसाला माती पासून बनवले अशी श्रद्धा आहे. मनुष्य वास्तवात आण्विक स्तरावरील पदार्थापासून बनला आहे.

जेव्हा उच्चस्तरीय जीवांनी मनुष्याची निर्मिती केली, तेव्हा त्यांनी निर्मात्याच्या आदेशानुसार तसे केले. निर्मात्याने त्यांना प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमेत मानव बनवण्याची सूचना दिली. आणि याचमुळे, आशियाई, गौरवर्ण, काळेसावळे आणि इतर प्रजाती आहेत. बाह्य स्वरूप भिन्न असले तरी आतील चेतना ही निर्मात्याने दिलेली होती आणि म्हणूनच सर्वांसाठी एकसारखे नैतिक गुण आहेत.उच्चस्तरीय जीवांना मनुष्याची निर्मिती करण्याचा आदेश देण्यामागे निर्मात्याचा हेतू, अंतिम काळामध्ये मनुष्य प्राण्याचा उपयोग करण्याचा होता, जेव्हा तो मोठ्या विश्वातील सर्व जीवांना - पवित्र जीवांसह मुक्ती प्रदान करेल.

पण मग निर्मात्याने उच्चस्तरीय जीवांना मनुष्याची निर्मिती इतक्या खालच्या स्तरावर करण्यासाठी का सांगितले असेल? याचे कारण असे आहे की सर्वात खालचा स्तर असल्याने आणि येथील जीवनमान अत्यंत दु:खदायक असल्याने, जेव्हा परिस्थिती कष्टदायक आणि दु:खदायक असेल तेव्हा मनुष्य साधना अभ्यासाच्या माध्यमातून आपला स्तर उंचावू शकतो आणि आपल्या कर्माचा भार हलका करू शकतो. कष्टदायी अनुभवांमधून जात असताना देखील जी व्यक्ती दयाळू विचार, कृतज्ञता भाव ठेवू शकते आणि एक चांगला मनुष्य म्हणून ठाम राहते, त्या व्यक्तीची या माध्यमातून उन्नती होते.

मुक्ती मिळवणे ही एक खालच्या स्तरावरून वरील स्तरावर जाण्याची प्रक्रिया आहे आणि म्हणूनच कोणालाही सुरवात खालच्या स्तरापासून करावी लागते. या स्तरावर प्रत्येकासाठी जीवन दु:खदायी आहे, आपले जगणे अधिक सुखकर करण्याच्या स्पर्धेत लोकांमध्ये तणाव वाढत आहे, नैसर्गिक वातावरण भयंकर चिंताजनक आहे. यात खरच तथ्य आहे की केवळ जीवन जगण्यासाठी देखील अनेक प्रकारे विचार करण्याची आणि प्रयत्न करण्याची गरज पडत आहे आणि ही तर केवळ थोडीच उदाहरणे आहेत. ही सर्व परिस्थिती लोकांना आपला स्तर उंचावण्यासाठी आणि आपल्या कर्माचा भार हलका करण्यासाठी एक संधी आहे. हे एक निश्चित सत्य आहे की कठीण परिस्थितीचा सामना करून लोक आपले पाप आणि कर्म यांचे प्रायश्चित्त करू शकतात. जी व्यक्ती दु:खदायी परिस्थितीमध्ये आणि आपापसातील मतभेदांमध्ये देखील चरित्रवान राहू शकते, ती गुणवत्ता आणि सदगुण यांचा संचय करते. परिणामस्वरूप त्या व्यक्तीच्या चेतनेचा उद्धार होतो.

आधुनिक काळाच्या आगमनासोबत निर्मात्याने विश्वातील अनेक जीवांना वाचवण्यासाठी मुख्यत: मानवी शरीराचे प्रयोजन केले होते आणि म्हणूनच बहुसंख्य मानवी शरीरामधील चेतना उच्चस्तरीय जीवाद्वारे बदलून त्यांनी मानवी शरीरामध्ये पुनर्जन्म घेतला. या मानवी शरीराद्वारे कष्ट सहन करून त्यांनी आपले पाप आणि कर्म कमी केले आणि अशाप्रकारे या मानवी जगात, जिथे सत्याचा अभाव आहे; तिथे भगवंताने शिकवलेल्या उच्चस्तरीय सत्याची कास धरत, चांगलेपणा आणि करूणा टिकवून ठेवत त्यांनी आपल्या चेतनेची उन्नती केली. आता अंत:काळ आपल्या जवळ येऊन ठेपला आहे आणि या त्रिलोकामधून बाहेर पडणारे आकाशीय लोकाचे द्वार उघडले आहे. निर्माता अशाच लोकांना मुक्ती देण्यासाठी निवडत आहे, जे मी वर सांगितल्याप्रमाणे वर्तन करतात.

निर्मिती- स्थिरता- पतन- विनाश या अवस्थां दरम्यान विश्वामधील प्रत्येक गोष्ट अशुद्ध होत गेली आणि जसे निर्मितीच्या वेळेस होते त्यापेक्षा निकृष्ट दर्जाचे होत गेले. हेच मूळ कारण आहे की आता सर्व गोष्टी विनाशाकडे वाटचाल करत आहेत. दुसऱ्या अर्थाने सांगायचे तर मोठ्या विश्वातील सर्व काही दूषित होत आहे, सृष्टीतील जीव आता सुरवातीला होते तसे शुद्ध राहिले नाहीत आणि त्यांनी पाप आणि कर्म हेच मोठ्या प्रमाणावर साठवले आहे. हेच येणाऱ्या विनाशाचे मूळ कारण आहे. अशा प्रकारच्या पापाला धार्मिक संदर्भात मूळ पाप म्हटले आहे. यातून विश्वाला वाचवण्यासाठी निर्मात्याने उच्च स्तरावरील जीवांना आणि पवित्र सार्वभौम जीवांना या पृथ्वीवर उतरून मानवी रूप धारण करण्यासाठी निर्देशित केले. इथे ते दु:खदायक पीडांचा सामना करत, आपल्या पापांचे प्रायश्चीत्त करतील आणि आपला स्तर उंचावतील. आणि अश्या प्रकारे स्वत:ला नवनिर्मित करून आकाशीय लोकाकडे परत एकदा प्रस्थान करतील (निर्माता मानव जातीला वाचवण्या बरोबरच नवीन विश्वाची निर्मिती देखील करत आहे). नवीन विश्व पूर्णत: शुद्ध आणि तेजस्वी असेल. आत्ताच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, जी व्यक्ती आपले सदाचारी विचार कायम ठेऊ शकते, आधुनिक विचार आणि मूल्यांच्या आक्रमणाच्या विरोधातदेखील टिकून राहून, आपल्या पारंपारिक मूल्यांवर ठाम राहू शकते, नास्तिक आणि उत्क्रांतीवादी गटाच्या हल्ल्याने विचलीत न होता पवित्रतेवर दृढ विश्वास ठेवते, ती व्यक्ती आपले मुक्ती आणि आकाशीय लोक प्राप्तीचे उद्देश्य गाठण्यात यशस्वी होईल. या जगात आत्ता जो उन्माद बाहेर येत आहे, त्याची या अंतिम चरणामध्ये उच्चस्तरीय जीवांनीच अशा प्रकारे होण्याची व्यवस्था केली होती. त्याचा उद्देश या संसारातील जीवांची परीक्षा घेणे आणि ते मुक्ती प्रदान करण्यासाठी योग्य आहेत की नाही हे परीक्षण करण्याचा होता. तसेच या प्रक्रियेमध्ये कठीण परिस्थितीचा सामना करत, पाप आणि कर्माचे प्रायश्चित्त करण्याची संधी देण्याचा होता आणि हे सर्व मानव जातीला वाचवण्याच्या उद्देश्याने, त्यांना मुक्ती आणि आकाशीय लोक प्राप्त करण्यासाठी होते.

हे सांगण्याचे तात्पर्य असे आहे की मनुष्याचा या पृथ्वीवरील जन्माचा उद्देश या भौतिक जगात काही तरी मिळवण्याचा नाही. लोक जीवनात गहन प्रयत्न आणि प्रयास करत असतात, आपल्याला हवं ते सर्व मिळवण्यासाठी त्यांचा उत्साह ज्यात अनुचित प्रकारांचा देखील समावेश होतो, या सर्वाचा शेवट अखेर ते अनैतिक होण्यामध्ये होतो. लोकांचे या जगात येण्याचे आणि मनुष्य जन्म घेण्याचे कारण त्यांच्या पापांचे आणि कर्माचे प्रायश्चित्त घेणे आणि साधना अभ्यासात लक्षणीय प्रगती करणे हेच आहे. लोक या जगात मुक्ती मिळवण्यासाठी आले. या संसारात येऊन त्यांनी मानवी शरीर धारण केले, ज्याने ते निर्माता आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या मुक्तीची प्रतीक्षा करू शकतील आणि त्याद्वारे आकाशीय लोकी परत जाऊ शकतील. या प्रतीक्षेदरम्यान मागील कित्येक जन्मात त्यांनी सदगुण प्राप्त केले. मनुष्याच्या पुनर्जन्माचा हाच मूळ उद्देश होता. या संसारातील त्रासदायक परिस्थिती मनुष्य जीवाला उच्चत्व प्राप्त करून देण्यासाठीच आहे. अर्थात काही लोक असे आहेत की कठीण परिस्थितीतून जात असताना भगवंताच्या मदतीची याचना करतात; पण त्यांना हवे तसे परिणाम न मिळाल्यास त्यालाच दोष देतात, त्याचा तिरस्कार करू लागतात. काही जण आसुरिक, दुष्ट मार्गांकडे जाऊन आणखी जास्त पाप करतात आणि आपली पापकर्म अजूनच वाढवतात. जे लोक अश्याप्रकारचे वर्तन करत आहेत; त्यांच्यासाठी हेच सर्वोत्तम आहे की ते स्वत:ला बदलून, भगवंताची क्षमा याचना करतील जेणेकरून त्यांना अजूनही सुरक्षित ठिकाणी पोचण्याची संधी मिळेल. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, मग ती यथोचित असेल किंवा नसेल, वास्तवामध्ये ती मनुष्याने केलेल्या मागील जन्मातील कर्माचे परिणाम असतात, मग भलेही ते चांगले किंवा वाईट असेल. मागील जन्मामध्ये एखाद्याने मिळवलेले आशीर्वाद, सदगुण यावरूनच त्याच्या या किंवा पुढच्या जन्मात त्याला मिळणारे भवितव्य ठरते. जर कोणी आज एक पवित्र आणि सदाचारी जीवन जगेल तर पुढच्या जन्मात त्या व्यक्तीला मोठे पद, प्रतिष्ठा यांचा लाभ होईल किंवा अनेक प्रकारची संपत्ती आणि ऐश्वर्य मिळेल. याचबरोबर त्या व्यक्तीला सुखी कुटुंब, मुलाबाळांचे चांगले भवितव्य या गोष्टी देखील प्राप्त होतील आणि हेच मूलभूत कारण आहे; ज्यामुळे काही लोक श्रीमंत आहेत तर काही गरीब, काही लोक उच्च पदावर आहेत तर काही निराधार आणि बेघर. हे कुटील कम्यूनिझमच्या श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये समानता आणण्याच्या मूर्ख विचाराच्या अगदी विपरीत आहे. हे विश्व न्यायपूर्ण आहे. जे चांगलेपणाने वागतात ते धन्य होतात तर जे वाईट काम करतात त्यांना त्याची परतफेड करावी लागते, या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात. हाच विश्वाचा अपरिवर्तनीय नियम आहे. आकाश, पृथ्वी, पवित्र जीव आणि निर्माता सर्व जीवाप्रती सारखेच करूणामयी आहेत. मनुष्याप्रमाणेच आकाश आणि पृथ्वी देखील निर्मात्यानेच निर्माण केले आहे आणि असे कधीच होत नाही की तो काही जीवांना अधिक प्रिय समजतो आणि इतर जीवांना कमी समजतो. काही लोक सुखी जीवन जगतात तर काहींना ते मिळत नाही, पण हे संपूर्णपणे त्यांनी केलेल्या भूतकाळातील कर्माचे फळ, अर्थात बक्षीस किंवा शिक्षा आहे.

जीवनात आपण लोकांना जिंकताना किंवा हरताना बघतो; ही या जगाच्या दृष्टीने एक स्वाभाविक घटना आहे, पण मुळात हा त्यांच्या भूतकाळातील केलेल्या कर्माचा परिणाम आहे. लोकांकडे काही गोष्टी आहेत किंवा नाही; जीवनात ते जिंकतात किंवा हारतात, हे सर्व या जगातील नियमानुसार दाखवले जाते. म्हणूनच आपण या जीवनात श्रीमंत आहात किंवा गरीब, आपण चांगलेपणाने वागले पाहिजे, वाईट काम करण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे, सदैव पवित्र आणि करुणामय राहिले पाहिजे, साधना अभ्यासक आणि श्रद्धाळू राहिले पाहिजे आणि आनंदाने दुसऱ्याची मदत केली पाहिजे. हे सर्व केल्याने आपण आशीर्वाद आणि पुण्य अर्जित कराल आणि त्याचे आपल्याला पुढील जन्मात फळ मिळेल. चीनमध्ये जुन्या पिढीतील लोक नेहमी म्हणत, जेव्हा परिस्थिती कठीण होईल, तेव्हा तक्रार न करता चांगल्या कर्मांच्या माध्यमातून सदगुण प्राप्त करून चांगले असे पुढचे जीवन अर्जित करू शकता आणि मुद्दा हाच होता की जर आपण मागील जन्मात चांगले कर्म केले नसेल आणि सदगुण संचय केला नसेल तर या जन्मात भगवंताची प्रार्थना करणे व्यर्थ आहे. विश्वाचे स्वतःचे नियम आहेत आणि उच्चस्तरीय जीवांना देखील पाळावे लागतात. जर त्यांनी असे कर्म केले जे त्यांनी करणे अपेक्षित नाही तर त्यांना देखील शिक्षा होते आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी तितक्या साध्या आणि सोप्या नाहीत जितके लोक समजतात. लोकांनी अशी आशा केली पाहिजे का? की जे काही त्यांना हवे आहे ते मिळण्याची प्रार्थना ते करतील आणि उच्चस्तरीय जीव त्यांना ते प्रदान करतील? खरं तर त्यांच्यासाठी हेच अनिवार्य आहे की त्यांनी मागील जन्मात याकरिता पुरेसे आशीर्वाद आणि सदगुण अर्जित करणे अपेक्षित आहे . म्हणूनच या जन्मात आपल्याला ज्या गोष्टी मिळतात त्या मागील जन्मात कमावलेले आशीर्वाद आणि सदगुण यांच्या हिशोबानेच असतात. विश्वाचे नियम देखील हेच निर्धारित करतात. पण अत्यंत मूलभूत पातळीवर विचार केला तर केवळ आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी आशीर्वाद आणि सदगुण संचय करणे हा मूळ उद्देश नाही. हे संचय करण्याचा खरा उद्देश म्हणजे म्हणजे आकाशीय लोक प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करणे हा आहे आणि हेच सर्वात महत्वपूर्ण आहे, क्षणिक सुख आणि आनंद जे यामुळे आपल्याला या जीवनात मिळेल ते तितकेसे महत्वाचे नाही.

मास्टर ली होंगज़ी
जानेवारी 20, 2023